खाडीपट्टयामध्ये इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली 

पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेने चिंभावेत केले भूमिपूजन

महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डचे नर्सरी ते बारावी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स आणि आयटी विभाग वस्तीगृह इमारतीचा तसेच नियोजित शाळेचा शुभारंभ भूमिपूजन व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेले हे पाऊल यशस्वी होणारच असे उपस्थितांसमोर प्रतिपादन केले.

चिंभावे येथील सुपुत्र पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुधाकर खैरे सर यांनी रविवारी चिंभावे बौद्धवाडी येथे स्वतःच्या मालकीची अडीच एकर जमीन नियोजित शाळेकरिता देणगी देऊन सदर वस्तीगृह इमारतीचा नियोजित शाळेचा शुभारंभ व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला.

यावेळी या सोहळ्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट महाड तालुका अध्यक्ष मोहन शेठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्य, ग्रामपंचायत चिंभावे मोहल्ला सरपंच शबाना ठोकण, सदस्य संदीप जाधव, माजी सरपंच अरिफ उबारे,चिंभावे ग्राम पं. माजी सरपंच जयवंत दळवी, चिंभावे बौद्धवाडी अध्यक्ष नरेश साळवी, विजय खैरे, दीपक साळवी, किशोर खैरे, लहू काणेकर, चिंभावे हायस्कूल मुख्याध्यापक अमृत तायडे आदी मान्यवरांसह पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये ग्रामीण भागामध्ये इंटरनॅशनल स्कूलच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊन पाच लाखाची देणगी देण्याचे कबूल करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानंतर देखील अधून मधून देणगी देत राहीन असे आश्वासित केले. तर संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच खैरे सरांचे अनेक मित्र परिवार यावेळी उपस्थित राहून सरांच्या या शैक्षणिक कार्यासाठी आम्ही सुद्धा सहकार्य करू असे सांगितले. 

दरम्यान, प्राचार्य सुधाकर खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सरकारी सर्व परवानग्या काढून प्रत्यक्षात जानेवारी 2026 पासून या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीला प्रारंभ होईल. सुमारे 20 कोटीचा हा प्रोजेक्ट असून अनेक दानशूर माझ्या संपर्कात आहेत. सर्वांच्या सहकार्याने सदर इंटरनॅशनल स्कूल पूर्णत्वाला जाईल. यावेळी चिंभावेसह पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित राहून प्राचार्य सुधाकर खैरे यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog